तिरुपती मंदिर ११ ऑगस्टपासून सहा दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हैदराबाद

तिरुमाला येथील भगवान वेंकटेश्वराचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर येत्या ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत म्हणजेच सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. महासंप्रोक्षम अनुष्ठान हा धार्मिक विधी लक्षात घेता मंदिर बंद ठेवण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. तिरुपती मंदिराच्या इतिहासात प्रथमच सलग सहा दिवस मंदिर बंद राहणार आहे.

पुढील महिन्यात तिरुपती मंदिरात जे महासंप्रोक्षम अनुष्ठान विधी होणार आहे, ते १२ वर्षांतून एकदा होते. या काळात धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात असल्याने भाविकांना दर्शनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र याच कालावधीत जास्तीत जास्त भाविक मंदिरात येतात, असा आजवरचा इतिहास आहे. यंदा अनुष्ठानाच्या काळात किमान साडेपाच लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे तिरुमाला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष पुत्ता सुधाकर यादव यांनी सांगितले.