
देशातील प्रसिद्ध धार्मिक देवस्थान तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट आता आणखी एका नव्या वादात अडकले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भात मोठा फसवणूक घोटाळा उघडकीस आला होता. आता आणखी नवा घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तिरुपती देवस्थानाच्या पवित्र सिल्क दुपट्ट्यांच्या व्यवहारांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ट्रस्टकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तिरुपती मंदिरात दिला जाणारा सिल्क दुपट्टा हा केवळ कपडा नाही तर, तिरुपती मंदिराची परंपरा आहे. तिरुपती तिरुमला देवस्थान रंगनायकुला मंडपममध्ये वेदाशिरवचनम दरम्यान दात्यांना आणि व्हिआयपी लोकांना सिल्कचे दुपट्टे दिले जातात. मात्र, कंत्राटदाराने 100 टक्के सिल्क दुपट्ट्यांसाठी पैसे आकारून प्रत्यक्षात मात्र पॉलिस्टर मिश्रित दुपट्टे तिरुमला देवस्थानला पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपट्ट्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने 100 टक्के सिल्क सांगत देवस्थानाला 1389 रुपये प्रत्येकी दुपट्टा पुरवला. या दुपट्ट्यांमधील काही दुपट्टे तपासणीसाठी नमुने म्हणून सेंट्रल सिल्क बोर्ड व इतर काही अधिकृत केंद्रांवर पाठवण्यात आले. मात्र, तपासणीअंती हे दुपट्टे सिल्क नसून पॉलिस्टरचे असल्याचे समोर आले. कोणत्याही दुपट्ट्यावर सिल्कचा हॉलमार्क नव्हता. त्यामुळे पुन्हा तिरुपती देवस्थान चर्चेत आले आहे.


























































