टायटॅनिक- सुदैवी आणि दुर्दैवी

586

>> द्वारकानाथ संझगिरी

बेलफास्टमध्ये टायटॅनिक म्युझियमकडे जाताना दोन प्रचंड ‘गॅण्ट्री’ दिसतात. त्याला सॅमसन ऍण्ड गॉलियथ म्हणतात. ग्रीक पुराणातल्या दोन शक्तिमान पुराण पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. 

बेलफास्टमधून कुठूनही या ‘गॅण्ट्री’ दिसतात एवढय़ा त्या मोठय़ा आहेत. अर्थात त्यांचा संबंध टायटॅनिकशी नाही. गॉलियथ गॅण्ट्री 1969 साली उभारली गेली, सॅमसन 1974 साली, पण या दोन ‘गॅण्ट्री’ बेलफास्टमधल्या बोट निर्मितीच्या इतिहासाची आठवण करून देतात. म्हणूनच शंकराला भेटताना आधी नंदीवर आपण बेल ठेवतो तसं टायटॅनिक म्युझियमला जाताना तिथे एक भेटीचा बेल ठेवणं मस्तच. ज्या ‘हार्टलॅण्ड ऍण्ड वुल्फ’ या कंपनीने टायटॅनिक बांधली, त्यांच्या शिपयार्डमध्येच या दोन गॅण्ट्री उभ्या आहेत. त्याच शिपयार्डमध्ये मोठय़ा गॅण्ट्रीज या कंपनीने उभ्या केल्या. 1960 मध्ये त्या काढून टाकण्यात आल्या. 17 सप्टेंबर 1908 साली टायटॅनिकचं काम सुरू झालं आणि 31 मे 1911 रोजी तिने बेलफास्टच्या लागन नदीत प्रस्थान केलं. ते दृश्य पाहायला एक लाख माणसे जमली होती. 1911 साली एक लाख माणसं लंडन, अमेरिकेतून आलेली. म्हणजे किती गवगवा या बोटीचा झाला असेल तो विचार करा.

या बोटीचं आतलं रूप एखाद्या सर्वोत्तम हॉटेलासारखं होते. या बोटीचं वर्णन तुम्हाला त्या काळात जाऊन वाचायचंय. मग त्यातली भव्यता कळेल. आपण शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय याचं भान असू दे. त्या बोटीला त्या काळात अकरा डेक होते. त्यातले आठ हे प्रवाशांसाठी होते. त्या बोटीची प्रवाशांची क्षमता 2453 होती. त्यात 691 पहिल्या वर्गाचे, 614 दुसऱया वर्गाचे आणि 1006 तिसऱया वर्गाचे होते. निव्वळ खलाशी आणि त्यांचा नोकरवर्ग ही संख्या नऊशेच्या वर होती. या बोटीचं इंटिरियर डिझाइन लंडन पिकॅडलीचं रिट्झ हॉटेल डोळय़ांसमोर ठेवून केलं होतं. जगातले ते एक लॅण्डमार्क उच्चभ्रू हॉटेल होतं. 1906 साली ते लंडनमध्ये उघडलं गेलं. त्यापूर्वी आठ वर्षे आधी पॅरिसला रिट्झ हॉटेल उभं राहिलं होतं. एम्पायर स्टाइल, रॅनसान्स  काळ आणि पंधराव्या लुईच्या काळातलं इंटिरियर तिथल्या पहिल्या दर्जाच्या केबिन्समध्ये आणि मोठमोठय़ा हॉलसाठी केलेलं होतं. आपण बोटीत नाही, तर कुठल्याशा मोठय़ा श्रीमंत घरात आहोत असं वाटल्याचं मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केलं. त्या काळात बोटीवर स्विमिंग पूल ही फार मोठी चैन होती. टायटॅनिकवर सात फूट खोलीचा तरण तलाव होता, एक जिम्नॅशियम होतं, स्क्वॉश कोर्ट होतं, स्टीम बाथ, मसाज रूम, थंड रूम, गरम रूम असे प्रकार होते. व्हर्सायच्या पॅलेसमधल्या लाऊंजसारखा लाऊंज होता. आज कदाचित या गोष्टी आश्चर्यचकित करणार नाहीत. कारण लक्झरीची पातळी आणि व्याख्या आता खूप वर गेलीय, पण त्यावेळी ती बोट हा पाण्यात तरंगणारा राजवाडा होता. टायटॅनिकच्या ग्रॅण्ड स्टेअरकेसचं भयंकर कौतुक झालं होतं. अस्सल इंग्लिश ओकच्या लाकडांनी ती तयार झालेली होतीच, पण तिची वळणं पाहून क्लिओपात्रालासुद्धा हेवा वाटला असता. सात डेकमधून ती फिरायची. अतिशय सुंदर पेंटिंग्ज तर जागोजागी होती. टायटॅनिकची दुसऱया दर्जाची केबिन इतर बोटींच्या पहिल्या दर्जाच्या केबिनच्या दर्जाची होती. तिसऱया दर्जाच्या केबिन्स इतर बोटीत डॉरमिटरी स्टाईलमध्ये असतात. टायटॅनिकमध्ये त्यांच्यापाठी आकर्षक केबिन्स होत्या. टायटॅनिक म्युझियममध्ये या सर्व केबिन्स आणि आतल्या सजावटीची झलक पाहायला मिळते. प्लेटस्, कप, ग्लासेस, चमचे, बश्या या गोष्टींमध्ये बोनचायनाचं राज्य होतं. त्या काळात जी अद्ययावत उपकरणं आयटी इंडस्ट्रीत उपलब्ध होती ती बोटीवर होती. उगीच नाही, अनेक श्रीमंत माणसे या टायटॅनिकच्या पहिल्या सफरीवर होती.

2 एप्रिलला टायटॅनिकने बेलफास्ट सोडलं. ती बोट 4 एप्रिलला साऊथम्प्टनला पोहोचली. साऊथम्प्टन हे इंग्लंडच्या दक्षिणेकडचं एक बेट. अटलांटिक महासागरात जाणाऱया बोटींसाठी साऊथम्प्टन हे मोठं विश्रामस्थान होतं. तो काळ असा होता जेव्हा इंग्लंड-युरोपातली मंडळी मोठय़ा संख्येने अमेरिकेला जात होती. अमेरिका हे त्यांच्यासाठी नवं नंदनवन होतं. आता 90-100 वर्षांनी ते हिंदुस्थानी तरुणांसाठी नंदनवन झालंय. टायटॅनिक हा देवमासा त्यांना त्यांच्या नंदनवनात घेउैन जाणार होता. त्यामुळेच ही बोट फ्रान्सला चेटबोर्गला गेली. चेटबोर्ग हा युरोपचा भव्य दरवाजा होता. त्यावेळी विमानसेवा नव्हती. श्रीमंत अमेरिकन्स युरोप पाहायला येत. ते बोटीने तिथे उतरत. गंमत पहा. या बंदरावर चक्क 274 पहिल्या वर्गाचे प्रवासी बोटीत चढले. फक्त तीस दुसऱ्याचे चढले आणि एकशे दोन तिसऱ्या वर्गाचे होते. ज्यांचं आयुष्य लवकर संपणारं नव्हतं असे बावीस प्रवासी बोटीतून या बंदरावर चक्क उतरले. केवळ टायटॅनिकचा अनुभव घ्यावा आणि उर्वरित आयुष्यभर जगाला सांगावं की,  टायटॅनिकमधून प्रवास केला. म्हणून त्यांनी प्रवास केला होता. नियती किती खटय़ाळ असते पहा. टायटॅनिक बुडाल्यानंतर त्यांनी येशू ख्रिस्तासमोर गुडघे टेकले असतील आणि देवाचे आभार मानले असतील. ते जिवंत राहून आयुष्यभर टायटॅनिकने फिरलो सांगायला मोकळे राहिले.

बेलफास्टमधील टायटॅनिक म्युझियममध्ये जर गेलात तर एक दिवस त्यासाठी ठेवा. तरच काही रंजक गोष्टी तुम्हाला वाचता येतील आणि पाहता येतील. या बोटीला साऊथम्प्टन सोडतानाच अपघात होणार होता. ती बोट गोदीतून रुबाबात समुद्रात जाताना तिचं ते निद्रावस्थेतून जागं होणे इतकं प्रलयकारी होतं की, बाजूच्या धक्क्यावर उभ्या असलेल्या न्यूयॉर्क बोटीचे किनाऱयाशी बंध तुटले. ती बोट वेगात टायटॅनिककडे ओढली गेली. ती टायटॅनिकवर आपटणारच होती, पण टायटॅनिकच्या खलाशांनी ऐनवेळी प्रसंगावधान दाखवून अपघात टाळला. तिथे एक फिल्म आहे. ती लंडनच्या वॉटर्लू स्टेशनवरून सुरू होते. टायटॅनिक स्पेशल ट्रेनमध्ये प्रवासी चढताना दिसतात आणि ती फिल्म संपते. टायटॅनिकमध्ये शिरल्यावर ही फिल्म कशी मिळाली ठाऊक आहे? एक फ्रॅन्क बाऊन नावाच फोटोग्राफर बोटीवर होता. त्याला त्याच्या काकाने टायटॅनिकचं साऊथम्प्टन ते क्वीन्सटाऊन्स  तिकीट दिलं होतं. बोटीवर त्याला एक अमेरिकन करोडपती भेटला. त्याने त्याला न्यूयॉर्कपर्यंत तिकीट द्यायची तयारी दाखवली. त्याने ऑफिसला कळवलं. ऑफिसने सांगितलं, ‘‘ताबडतोब परत यायचं!’’ त्याने आज्ञा पाळली. त्याच्यासाठी ती देवाची आज्ञा होती. तो वाचला. त्याने काढलेली फिल्म पाहायला मिळते. अजून बरंच काही इंटरेस्टिंग पुढच्या शेवटच्या भागात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या