अंगात भूत संचारल्याच्या संशयातून मायलेकाचा नरबळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगात भूत संचारल्याच्या संशयातून मायलेकाला ठार मारल्याची खळबळजनक घटना कल्याण तालुक्यातील अटाळी गावात घडली आहे. अंगावर भंडारा उधळत लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांचा बळी घेण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडात स्वतःचा अल्पवयीन मुलगा, पदवीधर असलेले पुतण्या, पुतणीसह मांत्रिकाचा सहभाग असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अंधश्रद्धेतून घडलेल्या या अघोरी प्रकाराने कल्याण हादरले आहे. पंढरीनाथ तरे (50) आणि चंद्राबाई तरे (72) अशी मृतांची नावे आहेत.

पंढरीनाथ यांची बहीण कुंदाबाई आणि भाचा देवेंद्र भोईर यांच्या फिर्यादीवरून मांत्रिक सुरेंद्र पाटील (50), कविता तरे (27 ), विनायक तरे (22) आणि पंढरीनाथ यांच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

गूढ वाढले

अंधश्रद्धेतून घडलेल्या या अघोरी नरबळी हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली असून आज अतिरिक्त पोलीस आयुक्त दतात्रेय कराळे, डीसीपी विवेक पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. केवळ अंधश्रद्धेतून हे हत्याकांड घडले की कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, जमीन – जागेच्या वादाची याला किनार आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत. हत्याकांडात संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याने गूढ अधिकच वाढले आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार अधिक तपास करत आहेत.