टिवल्या बावल्या-कॉपीकॅट

>>शिरीष कणेकर

माझा पत्रकार-मित्र (हे म्हणजे नरेंद्रजी व राहुलजी एकाच चौरंगावर दाटीवाटीनं व गळय़ात गळा घालून ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ गात बसल्यासारखं वाटतं.) आनंद केतकर याचा मला पुण्याहून फोन आला.

‘‘अरे, त्या फलाण्या फलाण्याला किती मुलं आहेत?’’ त्यानं म.टा. शैलीत विचारलं.

आँ? मी बुचकळय़ात पडलो आणि म्हणालो, ‘‘मला काय माहीत? कसं माहीत असणार? माझा त्याच्याशी काही संपर्कही नाही. मला माहीत असेल असं तुला का वाटलं?’’

‘अरे, तसं नाही रे. तो तुझी सही सही नक्कल करतो. कॉपीकॅट. तेव्हा म्हटलं तुला दोन मुलं आहेत तर त्यालाही तेवढीच असायला हवीत. जास्त किंवा कमी कशी चालतील?’’

विनोद चांगला होता. मला हसवून गेला. शिवाय सुखावूनही गेला.

या निमित्ताने एका पुरातन प्रश्नाला माझ्या मनात खोकल्यासारखी उबळ आली. अभिनय, लेखन किंवा एकूणच चालण्याबोलण्यात माणसं दुसऱयाची नक्कल का करतात? काय मिळतं यातून त्यांना? कोणाची तरी कार्बन कॉपी व्हायचं व कार्बन कॉपी म्हणूनच ओळखलं जायचं यात त्यांना काय धन्यता वाटते? प्रत्येक माणसात कमी अधिक प्रमाणात ‘मी’पण असतंच असतं. ते जपण्यात व फुलवण्यात माणसं आयुष्य वेचतात. आपण स्वतःचं असं काहीतरी केलं याचं अतीव समाधान त्यांना मिळत असतं, हे समाधान कमी असेल, जास्त असेल, पण समाधान हे समाधान असतं. सचिन तेंडुलकर एकच असेल पण अन्य फलंदाजांनी त्यांच्या परीनं बॅट चालवलीच की.

माणसं अशी आपलं स्वत्व दुसऱयाच्या चरणी का समर्पित करतात? (व त्या चरणांना यथोचित श्रेय नाकारण्याचा कृतघ्नपणा, सातत्यानं का करतात?) हे आपलं नाही, आपण उधार उसनवारी करतोय, राजरोस डल्ला मारतोय याची टोचणी त्यांच्या मनाला लागून राहत नाही का? बहुधा नसावी. मन निगरगट्ट करण्याची कला त्यांना साधली असावी. किंबहुना नक्कल करण्याची ती पूर्वतयारी मानली गेली असावी. संवेदनशील माणसाची ही कामं नव्हेत. पापभिरू माणूस लिफ्टमध्ये कोणा तरुणीचा हात धरेल का? अन् धरला तर हातापाया पडून त्याला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. नकलाकारांना या वणव्यातूनही जावं लागत नाही. ते उजळ माथ्यानं राजरोस फिरत असतात. ‘सेट टॉप बॉक्स’च्या ‘डुप्लिकेट’ रिमोटप्रमाणे!

मुकेश खन्ना अल्पकाल अमिताभ बच्चनचा ‘डमी’ म्हणून वावरला. तो अमिताभसारखा ताडमाड उंच होता व त्याच्यासारख्या आवाजात तशीच संवादफेक करायचा, त्याचं हे सोंग ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेतील ‘भीष्मापुरतं चालून गेलं. नुसता उंच असला की माणूस अमिताभ बच्चन होत नसतो व नुसता बुटका असला की माणूस लालबहादूर शास्त्री होत नसतो (तो शिरीष कणेकरही असू शकतो.) मुकेश खन्ना आज कुठे आहे? अमिताभ मात्र होता तिथेच आहे. टॉपला!

चारुशीला बेलसरे व संजीवनी भेलांडे प्रतिलता म्हणून आल्या. आल्या म्हणजे आल्याच नाहीत. त्या लता नव्हत्याच तर लता म्हणून कशा स्वीकारल्या जातील? मध्यंतरी एक बंगाली गायिका खूपशी लतासारखी गायची व बोलायचीदेखील. ती लताची परमभक्त होती. ती लताकडे गेली व म्हणाली ‘‘मी तुमची भांडी घासीन.’’

‘‘भांडी कशाला घासतेस? गाणी म्हण.’’ लता तिला म्हणाली. सध्या ती गाणी गात्येय की भांडी घासतेय कळलं नाही.

हे नकलाकार किंवा ‘कॉपीकॅट’ हळूहळू स्वतःला ‘ओरिजिनल’ समजायला लागतात. आसपासचे त्यांच्या भ्रमाला खतपाणी घालतात. बेडकी फुगते, फुगते व एक दिवशी फुटते. सुब्बीराजचं काय झालं? तारिक शहानं एक चित्रपट केला की दोन केले? साजिद खान कुठे गायब झाला?… मनोजकुमार व राजेंद्रकुमार स्वतःला ‘ओरिजिनल’ समजायला लागले असावेत काय? बहुधा असावेत. ‘शबनम’मध्ये दिलीपकुमारचं नाव मनोज होतं म्हणून हरेकृष्ण गोस्वामीनं ते धारण केलं. सुरुवातच इथून. सनी लिऑननं मीनाकुमारी नाव घेतलं तर तेवढय़ानं ती मीनाकुमारी होईल का? राजेंद्रकुमारचा एक किस्सा सांगतो. तो एकदा रात्री लेखक सलीम खान (बेटर नोन टुडे ऍज सलमान्स फादर!) कडे गप्पा मारायला गेला. दोघं पाय मोकळे करायला बाहेर पडले. वाटेत राजेंद्रकुमार सतत आपला मोठेपणा, आपली लोकप्रियता याचा बडेजाव सांगत होता. परतल्यावर सलीमच्या फाटकात त्याचा कुत्रा राजेंद्रकुमारवर भुंकत होता. ते पाहून सलीम त्याला म्हणाला, ‘‘देखो, कुत्ता भी तुम्हे नहीं पहेचानता.’’

त्यावर राजेंद्रकुमारचं काय झालं कळलं नाही. नकलाकार कधी खजिल होतात का? आद्य चित्रपट ‘गॉसिप’ कार बाबुराव पटेल यांनी त्यांच्या ‘फिल्मींडिया’च्या प्रश्नोत्तराच्या सदरात चक्क लिहिलं होतं-, ‘आजकाल दिलीपकुमारच राजेंद्रकुमारची कॉपी करीत असतो.’ तोड नाही- तोड नाही. बाप रे, म्हणजे मलाही असलं ऐकायची व पचवायची तयारी ठेवावी लागेल.

तुम्ही नक्कल करता म्हणजे त्या व्यक्तीची आधी मानसपूजा करता. मग त्याचं अनुकरण करता व यथावकाश आपण त्याची जागा घेतल्येय असं स्वतःलाच पटवून देता. या मार्गानं पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, जी. ए. कुलकर्णी गल्लोगल्ली पानाच्या ठेल्यावर दिसतात. थोर लेखक होण्यापेक्षा लेखकूनेच स्वतःला थोर मानणं सोपं. कॉपी जिंदाबाद!

मी माझ्या अमेरिकेतल्या चार वर्षांच्या नातीशी व्हिडीयो-कॉलवर बोलत होतो. तिला गंमत वाटावी म्हणून मी तिच्यासारखे आवाज काढत होतो. पण ती उलट चिडली-सॉरी ‘अनॉय’ झाली.

‘‘यू कॉपीकॅट!’’ किंचाळली.

मी कॉपीकॅट? मग खरा, हाडाचा, ‘ओरिजिनल’ कॉपीकॅट बघितला तर ती काय म्हणेल? तेच म्हणेल जे ती मला म्हणाली,- ‘शॅट् अप!’…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या