
घोडबंदर मार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी पाहता ठाणे महापालिकेने बाळकूम ते गायमुखदरम्यान 13.45 किमी लांबीचा रस्ता बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र या रस्त्याच्या आड 1 हजार 534 कांदळवन येत असून या झाडांच्या कत्तलीसाठी ठाणे महापालिकेने हायकोर्टात धाव घेतली आहे. कांदळवन तोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पालिकेने केली असून या याचिकेप्रकरणी हायकोर्टाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे ठाण्यातील घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे पालिकेने बाळकूम ते गायमुख हा 13.45 किमी लांबीचा डीपी रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या बांधकामाआड 1 हजार 534 कांदळवने येत आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय कांदळवन तोडता येत नाहीत. ही कांदळवन तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात ठाणे पालिकेने याचिका दाखल केली असून त्यावर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. पालिकेच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले की या कांदळवनाच्या बदल्यात तीन पट झाडे लावण्यात येणार आहे.
– प्रस्तावित रस्ता खारफुटी क्षेत्रावर आणि 50 मीटरच्या खारफुटी बफर झोनवर परिणाम करत असल्याने ठाणे पालिकेने न्यायालयाची परवानगी मागितली आहे.
– खारफुटी कक्ष आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) या प्रकल्पाला मंजुरी दिली असली तरी पालिकेला खारफुटीवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही कामासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.


























































