
देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचे तसेच एलपीजी, पेट्रोल, डिझेलची टंचाई नसल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, देशभारात सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे फलक पेट्रोल पंपांवर लागले आहेत. त्याचा विरोधकांनी संसदेत निषेध केला. सिलेंडरचे चित्र असलेला टी-शर्ट घालून टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन संसदेत आले. तसेच या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव यांनी टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांचा एक व्हिडिओ शेअर करून भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात एक एक्स-पोस्ट केली. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, प्रश्न: एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस असतो? उत्तर: कृपया स्पष्ट करा की हा प्रश्न युद्धापूर्वीच्या वजनाबद्दल विचारत आहे की भाजप सरकारने सिलेंडरमधील गॅस कमी केल्यानंतरच्या वजनाबद्दल? जेव्हा आम्हाला सिलेंडर मिळेल, तेव्हा आम्ही त्याचे वजन करून तुम्हाला कळवू, नाहीतर, यावेळी प्लेट वापरण्याऐवजी आम्ही सिलेंडर बडवू, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सपा प्रमुख अखिलेश यादव सिलेंडरच्या तुटवड्यावरून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. ते म्हणतात की, जर सरकार एलपीजी आणि पेट्रोलचा तुटवडा नसल्याचा दावा करत असेल, तर लोक रांगा का लावत आहेत? उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी लोकांच्या रांगा दिसल्या, काहींनी तर असाही आरोप केला की, तासन्तास रांगेत थांबूनही त्यांना सिलेंडर मिळू शकला नाही. भाजपच्या राजवटीत स्वयंपाकाच्या गॅससारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागते, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
समाजवादी पक्षाच्या मीडिया सेलनेही टीएमसी खासदाराचा व्हिडिओ शेअर केला. पक्षाने लिहिले आहे, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत एलपीजीच्या तुटवड्याविरोधात आंदोलन करण्याची एक नवीन पद्धत अवलंबली आणि आपल्या टी-शर्टवर स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे चित्र चिकटवून प्रतिकात्मक निषेध नोंदवला.






























































