
यंदाच्या सरत्या वर्षात निसर्गाने भरगच्च खगोलीय मेजवानी अंतराळप्रेमींना भरभरून दिली आहे. ऐन दिवाळीत सूर्य ग्रहणाचा अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. आणि आज वर्षाच्या शेवटी सहज डोळ्यांना दिसणारे चंद्रग्रहण पाहण्याची संधी अंतराळप्रेमींना मिळणार आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दोन घटना म्हणजे अंतराळाच्या भव्य व्यासपीठावर घडणारे भव्य आणि देखणे नाट्य.. आजचे हे चंद्रग्रहण दुपारी 2.३९ वाजता सुरु होणार आहे. दुपारी ३.४७ ते ५.१२ या वेळेत चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती निर्माण होईल. संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे. मुंबई – महाराष्ट्रात ग्रस्त स्थितीतच चंद्रोदय होणार आहे. आपल्याकडे पूर्वेकडील राज्यात चंद्र खग्रास स्थितीत दिसणार आहे. कोलकातामध्ये खग्रास स्थितीमध्ये ब्लड मून दिसणार आहे. ६.१९ मिनिटांनी ग्रहण सुटायला सुरुवात होणार आहे. ग्रहणाचे वेध सकाळी ११ वाजल्यापासून लागणार आहेत. हिंदुस्थानात पुढील चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ दिवशी होणार आहे.

ब्लड मून म्हणजे काय?
जेव्हा संपूर्ण चंद्र झाकला जातो तेव्हा चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. याला ब्लड मून म्हणतात. जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रापर्यंत पोहोचतात तेव्हा वातावरणात असलेल्या सूक्ष्म धुलीकणांमुळे चंद्र आपल्याला लाल दिसतो. अनेक तरंगांमधून प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो. त्यामुळे अनेक प्रकारचे प्रकाश दिसतात. यामुळेच त्यावेळी आकाश निळे दिसते.
का विशेष आहे हे चंद्रग्रहण?
आजचे हे चंद्रग्रहण विशेष आहे कारण यानंतर पुढील तीन वर्षे म्हणजेच २०२५ पर्यंत पुन्हा अशी स्थिती निर्माण होणार नाही.चंद्राच्या अगदी जवळ, किंचित पश्चिमेला जेमतेम दीड अंशावर युरेनेस हा ग्रह आहे. तो नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही. पण छोट्या दुर्बिणीतून चंद्राला पाहिले आणि त्याला केंद्रस्थानी ठेवले तर वरच्या बाजूला युरेनस दिसेल.

पुढील वर्षी चार ग्रहणे-
२०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. २० मे रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४ ऑक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २७/२८ ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल.
ग्रहण म्हणजे अंतराळाच्या भव्य व्यासपीठावरील एक देखणे भव्य नाट्य… प्रत्येकाने पाहावे असे..त्यामुळे त्याला उगाच अंधश्रद्धेची धार्मिक जोड न देता ही सुंदर खगोलीय घटना प्रत्येकानेच पाहायला हवी.





























































