
सामना प्रतिनिधी । मुंबई
चिंचपोकळी येथील एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील शेडवर 18 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोही राणे असे त्या चिमुकलीचे नाव होते. ती तिची मोठी बहीण व आई-वडिलांसोबत चिंचपोकळीच्या प्रोग्रेसिव्ह को-ऑ. सोसायटी या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होती. आज दुपारी दीडच्या सुमारास तिची आई घरात काम करत असताना आरोही घराबाहेर पडली. बराच वेळ ती घरी न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला; परंतु तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
त्यामुळे पालकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात आरोही हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलीस व इमारतीमधील नागरिकांनी शोधाशोध सुरू केल्यावर इमारतीच्या तिसऱया मजल्यावर असलेल्या शेडवर आरोही मृतावस्थेत सापडली. ती चौथ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
























































