टोकियो ऑलिम्पिक होणार की नाही? कोरोना व्हायरसचे पडसाद

463

चीनमधील कोरोना व्हायरस फटका जपानमधील टोकियो येथे होणाऱया प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिकवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणारे ऑलिम्पिक रद्द होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पाऊंड यांनी यावेळी व्यक्त केली. पण पुढे ते म्हणाले, अजून आमच्याकडे तीन महिन्यांचा अवधी आहे. मे महिन्यात टोकियो ऑलिम्पिक होणार की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो.

आयोजक बदलणार नाही अन् स्पर्धाही पुढे ढकलणार नाही

टोकियो ऑलिम्पिकचे यजमान बदलणार का किंवा हा क्रीडा महोत्सव पुढे ढकलणार का, असा सवाल केला असता डिक पाऊंड म्हणाले, असे होऊ शकत नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात इतरत्र ऑलिम्पिकचे आयोजन करता येणे शक्य नाही. कारण सहा ते सात महिन्यांच्या अवधीत इतक्या मोठय़ा महोत्सवाचे आयोजन कोणत्याही देशाला जमणार नाही. त्यामुळे जर कोरोना व्हायरस नियंत्रणात आणले नाही तर टोकियो ऑलिम्पिक रद्द होईल, असे ते ठामपणे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या