
देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादन वाढीमुळे गुणवत्ता चांगली असूनही नाशिकच्या टोमॅटोच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी, दरात घसरण सुरू असून आज सलग तिसऱया दिवशी नाशिक बाजार समितीत किमान दर अवघा दोन रुपये किलो पुकारला गेला. यातून साधा वाहतूक खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. कांद्यापाठोपाठ हा मोठा फटका बसल्याने उत्पादक हवालदिल आहेत.
नाशिक बाजार समितीत मागील महिन्यात सुरुवातीला 646 क्विंटल इतकी टोमॅटोची आवक होती. तेव्हा कमाल 30, सरासरी 20 व किमान दर 6 ते 7 रुपये किलो मिळत होता. त्यानंतर आता दिंडोरी व कळवण पट्टय़ातील टोमॅटो बाजारात आल्याने आज आवक 1100 क्विंटलवर पोहोचली. या वाढीच्या तुलनेत मागणी मात्र अत्यल्प असल्याने किमान दर 2, कमाल दहा व सरासरी साडेसहा रुपये किलो मिळाला. दिंडोरी बाजार समितीच्या खोरीफाटा उपआवारात आज 700 क्विंटल आवक होती. दर 2.5-12.50-5.50 असा होता.
पिंपळगाव बाजार समितीत ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान हंगाम असतो, तेव्हा 70 हजार ते एक लाख क्विंटलच्या घरात आवक असते. मागील वर्षी बांगलादेशात निर्यात सुरू असल्याने 35 ते 50 रुपये किलो कमाल दर मिळाला. मात्र, आता येथील आवक कमी आहेच, तसेच बांगलादेशात होणारी निर्यातही थांबली आहे. पिंपळगावला रविवारी आवक 393 क्विंटल व दर 2.5-10.50-5 असे होते.
यावर्षी लांबलेल्या पावसामुळे व नंतर बरसलेल्या अवकाळीमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश येथेही टोमॅटोची लागवड वाढली. आता तोही मोठय़ा प्रमाणावर बाजारात येऊ लागल्याने यंदा उन्हाळ्यातही उत्पादन चांगले राहणार, अशी चिन्हे आहेत. परिणामी, पुढील काही महिने दरात वाढ शक्य नसल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे.

























































