इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉनला जबरदस्त हादरा बसला आहे. हिजबुल्लाहच्या म्होरक्याला मारण्यासाठी थेट लेबनॉनची राजधानी बैरूतवर जोरदार हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे लेबनॉनचे सरकार आणि नागरिकही प्रचंड हादरले आहेत. हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह आणि उपप्रमुख नाबील कौक या दोघांचा खात्मा झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यामुळे लेबनॉनचे लष्कर आणि सरकार गायब असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सिरियाकडे पलायन सुरु केले आहे. अनेकांनी रात्र अक्षरशः रस्त्यावर जागवली. दरम्यान, हिजबुल्लाहच्या टॉपच्या 7 कमांडर्सचा खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलची विमाने कधी येतील आणि बॉम्ब टाकून जातील याची शाश्वती नसल्याने लेबनॉनी नागरिकांनी रात्र अक्षरशः रस्त्यावर जागून काढल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रांनी दिले आहे. दरम्यान, आजही इस्रायलने उत्तर लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 17 जणांचा मृत्यू झाला.
100 हून अधिक हुथी बंडखोरांचा मृत्यू
इस्रायलने आज हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 100 हून अधिक हुथी बंडखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्रायली सैन्यांनी येमेनमधील होदेदाह बंदरासह काही वीज निर्मिती प्रकल्पांना लक्ष्य केले आहे.
नेतान्याहू म्हणाले, आशीर्वाद की शाप हे ठरवण्याची वेळ
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, दोन नकाशे दाखवत, जगाने आशीर्वाद हवा की शाप हे ठरवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यापैकी पहिल्या नकाशात इराणसह इतर काही देश दिसत होते. या नकाशावर द कर्स म्हणजेच शाप असे लिहिले होते. तर, हिंदुस्थानसह इतर काही देश दाखवलेल्या नकाशावर द ब्लेसिंग (आशीर्वाद) लिहिले होते.
हिजबुल्लाहचे नेतृत्व संपवले
हिजबुल्लाहचे संपूर्ण नेतृत्वच इस्रायलने संपवले आहे. याआधी त्यांनी संघटनेचे कमांडर ठार केले. त्यानंतर संघटनेचा म्होरक्या हसन नरसरल्लाह आणि आज संघटनेचा उपप्रमुख नाबील कौक याचा खात्मा केला. त्यामुळे लेबनॉन सरकारमध्येही इस्रायलच्या हल्ल्याची दहशत निर्माण झाली आहे. याआधी अल कराकी याचा मृत्यू झाल्याचे इस्रायलने म्हटले होते. बैरुतमधील हिजबुल्लाहचे जमिनीखालील अड्डे टार्गेटवर होते असे इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कराकी याच्यावर हल्ला केला तेव्हा हिजबुल्लाहचे 20 इतर दहशतवादीही मारले गेले. त्याचबरोबर नसरुल्लाहचे दोन सहकारीही ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.