पंढरपुरातील ‘दर्शन’ दलालाची गचांडी धरली, प्रतिव्यक्ती ४०० रूपये उकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पंढरपूर

पैसे घेवून शॉर्टकट मार्गाने भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाला सोडणाऱ्याला पोलिसांनी काल ताब्यात घेतलंय. कैलास डोके असं या दलालाचे नाव आहे.  हैदराबाद येथील भाविक  श्रीनिवासराव पीठे (वय 50 वर्ष) व त्याची पत्नी लक्ष्मी पीठे हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी कैलास डोकेने त्यांनाआत खूप गर्दी आहे, तुम्हाला शॉर्टकट मार्गाने दर्शन घडवितो असं सांगत माणशी चारशे  रूपये उकळले. डोकेने मंदिर समितीच्या एका सदस्याला फोन करुन पासची व्यवस्था केली. हा पास घेऊन दर्शनासाठी जात असताना डोकेचं बिंग फुटल्याने त्याची गचांडी धरण्यात आली.

मंदिरात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल वामन यलमार यांना डोकेवर संशय आल्याने त्यांनी त्याला हटकले. चौकशी केली असता डोके आणि त्याच्यासोबत आणखी दोघेजण  दर्शनासाठी आत जात असल्याचं त्यांना कळाला. डोके याच्यासह भाविकांना बाजूला घेण्यात आले. भाविकांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर डोकेला पकडण्यात आलं. पोलिसांनी पुराव्यासह केलेल्या या कारवाईनंतरही मंदिर समितीने असं काहीच घडलं नसल्याचं म्हटतेय. पंढरपुरात पैसे घेून दर्शन देणाऱ्यांचं मोठं रॅकेट असल्याची जोरात चर्चा आहे. डोकेची अटक हा यातील मोठा पुरावा आहे. मात्र तरीही मंदीर समिती कानावर हात ठेवत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.