
सामना प्रतिनिधी । परभणी
तालुक्यातील हादगाव शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम खुरु असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालक जागीच ठार झाला. शेख शकिल शेख जानिमिया (३०) असे मृत चालकाचे नाव असून रविवारी दुपारी ११:३० वाजता ही घटना घडली.
सेलू तालुक्यातील हादगाव (खु.) शिवारातील भिकन अंभोरे यांच्या गट क्र. ८१ मधील शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. रविवारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालक शेख शकिल शेख जानिमिया हे विहिरीचे खोदकाम करत होते. यावेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. यात चालक शेख शकिल यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
या प्रकरणी शेख चांद शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन मृत चालकाविरुद्ध निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक डॉ. नितीन काशिकर हे करत आहेत.




























































