कॉरिडॉरमध्ये दुकान जाण्याच्या भीतीने व्यापाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

पंढरपूर कॉरिडॉरअंतर्गत होणाऱ्या रुंदीकरणामुळे दुकान जाणार असल्याच्या चिंतेत असलेले महाद्वार चौक येथील व्यापारी गोरख वामन वांगीकर (64) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा सूरज यांनी केला आहे.

दरम्यान, संतापलेल्या वांगीकर कुटुंबीयांसह व्यापाऱ्यांनी महाद्वार चौकात त्यांची अंत्ययात्रा आल्यावर ‘पंढरपूर कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे,’ अशा घोषणा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीत येऊन घोषणा केल्यापासून कॉरिडॉर करण्याच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे गेल्या तीन दिवसांपासून संभाव्य बाधितांशी चर्चा करीत आहेत. साडेपाचशेहून अधिक नागरिक, व्यापारी यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या व रुंदीकरणाबाबत चर्चेस बोलाविले होते.

मयत गोरख वांगीकर हे सोनार असून त्यांचे महाद्वार शॉपिंग सेंटर येथे अनेक वर्षांपासून दुकान आहे. वांगीकर यांनाही प्रशासनाची नोटीस आली होती. त्यानुसार शुक्रवार, 2 मे रोजी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कॉरिडॉरला विरोध दर्शविला होता. ते नोटीस मिळाल्यापासून अस्वस्थ होते.