सुतार कारागिरांवर उपासमारीची वेळ, रेडीमेड अवजारांमुळे बलुतेदरी अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील पूर्वी शेतीसाठी लागणारे कृषी अवजारे तयार करण्यासाठी शेतकरी सुताराकडे जात असत परंतु बेसुमार वृक्षतोड व बाजारात लोखंडी रेडीमेड अवजारे मिळत असल्यामुळे बारा बलुतेदारापैकी सुतार व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पूर्वीपासून ग्रामीण भागात बलुतेदार पद्घत अस्तित्वात होती. परंतु बदलत्या काळाच्या ओघात लाकडी अवजारांची जागा लोखंडी अवजाराने घेतली असल्यामुळे सुताराच्या व्यवसायावर संकट कोसळले आहे. गावातील शेतकऱ्यांना वर्षभर लागणारे शेतीचे साहित्य वखर, नांगर, कोळपे, सरते, तसेच दारे, चौकटी, लाकडी पलंग, बैलगाडी अवजारे सुतारच बनवित असत. परंतु यांत्रिक अवजारांचे जाळे निर्माण झाल्यामुळे पुरातन अवजारांचे अस्तित्वच नष्ट होत आहे. शेतकऱ्यांना वर्षभर लागणारे साहित्य तयार करून त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून बलुतेदारी स्वरूपात धान्य मिळत असे. ग्रामीण गावोगाव गावात पाच – सहा घरे सुतारांची असायची परंतु पिढीजाद व्यवसाय बंद पडत असल्यामुळे शहरात लागेल ते काम व्यवसाय करण्यासाठी तरूण पिढी जात आहे. त्यामुळे या समाजातील व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. बाजारामध्ये प्लास्टीक पासून बनवलेली व लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्यामुळे व शेती विषयक साहित्य स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी रेडीमेड अवजारांकडे आकर्षित झालेला आहे.

वडीलोपार्जित व्यवसाय चालवत असून ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवण्यासाठी नामशेष होणाऱ्या या कारागिरांना शासनाने ठोस उपाययोजना करून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या बंद पडत असलेल्या व्यवसायाला उभारी दिली पाहिजे, अशी मागणी मारोती पांचाळ यांनी दै. सामनाशी बोलताना केली आहे.