पाच वर्षापासून धूळ खात पडलेले राहुरी – शिंगणापूर फाट्यावरील वाहतूक नियंत्रण कक्ष अखेर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

गेल्या पाच वर्षापासून धूळ खात पडलेले राहुरी – शिंगणापूर फाट्यावरील वाहतूक नियंत्रण कक्ष अखेर सुरू करण्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ५ वर्षापुर्वी राहुरी शिंगणापूर फाट्यावर वाहतुक नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली होती. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी नियंञण कक्ष सुरू ठेवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे हे नियंत्रण कक्ष धुळ खात पडून होतं. या नियंञण कक्षाची साफसफाई करून दोन पोलिसांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याने पाच वर्षापासून साडेसातीच्या फे-यात अडकलेला वाहतूक नियंत्रण कक्षाची सुटका होऊन शिर्डी व शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांना दिलासा मिळाला आहे.

गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेल्या नगर मनमाड राज्य मार्गालगतच्या राहुरी शिंगणापूर फाट्यावर अनेकवेळा शिर्डी – शिंगणापूरला देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. तसेच गेल्या वर्षभरात दरोडेखोरांच्या पाच टोळ्या येथे जेरबंद केल्या आहेत. त्यामुळे या नियंत्रण कक्षात कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी नागरीक करत आहेत.