
प्रसिद्ध ब्रिटिश गायक आणि गीत लेखक इड शीरॅन याच्या चाहत्यांनी आज दक्षिण मुंबईतील वाहतुकीचा अक्षरशः बॅण्ड वाजवला. महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आयोजित शीरॅनच्या कॉन्सर्टला एकाच वेळी 30 हजारांहून अधिक चाहते गाडय़ा घेऊन आल्याने वाहतुकीचा बट्टय़ाबोळ झाला. एल्फिन्स्टन आणि अगदी वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. हजारो गाडय़ा एकाच वेळी एकाच मार्गावर आल्याने वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपिट उडाली.
कॉन्सर्टसाठी तब्बल 35 हजार तिकिटांची विक्री झाली होती. इतक्या मोठय़ा संख्येने तिकिटांची विक्री झाल्याने वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेत दक्षिण मुंबईतील वाहतूक मार्गात आवश्यक बदल केले होते. तसेच चाहत्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सांगा असेही पोलिसांनी आयोजकांना सुचित केले होते. त्यानुसार आयोजकांनीदेखील चाहत्यांना कार्यक्रमाला येताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र चाहत्यांनी त्या आवाहनाला धुडकावून लावले.
आयोजकांवर कारवाई करणार
कार्यक्रमासाठी 35 हजार तिकिटांची विक्री झाल्याने आम्ही महालक्ष्मीकडे जाणाऱया मार्गावर आवश्यक ते बदल केले होते. शिवाय चाहत्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वार करण्यास सांगावे असे आयोजकांना सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात हजारो वाहनांचा लोंढा एकाच वेळी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. याची आम्ही गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी आयोजकांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी सांगितले.


























































