
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर सोमवारी संध्याकाळी ठेकेदार कंपनीचा काँक्रीट मिक्सर अचानक बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या अगोदरच मिक्सर बंद पडल्याने कामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिक्सर पुलाच्या मध्यभागीच बंद पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढत असून प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या घटनेने या कोंडीत आणखी भर पडली. या ठिकाणी पोलीस आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली. मात्र मिक्सर पुलावरच उभा असल्याने वाहनांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागत होता.





























































