
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
पुणे – नगर राज्यमार्गावर शिक्रापूर (मलठण फाटा) येथील चौकामध्ये सततची वाहतूक कोंडी होत असून या ठिकाणी शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत कायमस्वरुपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या ठिकाणी विरुध्द दिशेने येत असलेल्या वाहनांवर कडक कारवाई केल्यास वाहतूक कोंडी आळा बसेल, अशी आशा परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पुणे – नगर राज्यमार्गावर वाहतुक कोंडी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. येथील स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार, कामगार, शाळकरी मुले यांना या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सततच तोड द्यावे लागत आहे. काही केल्या वाहतूक कोंडी सुटत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. बेशिस्त वाहनचालक वाहतूक कोंडीला कारणीभुत ठरत असल्याने शिक्रापूर मध्ये महामार्गावर वाहतूकीची परिस्थिती आतिशय गुतांगुतीची होत चालली आहे. पूर्वी शिक्रापूर मधील मलठण फाटा, पाबळ चौक, चाकण चौक या ठिकाणी आठवड्यातील काही विशिष्ठ दिवशीच वाहातुक कोंडी व्होत असे. परंतु आता रोजच वाहतूक कोंडी होत असताना पाहावयास मिळत आहे. यावर पर्याय म्हणून पोलीस खात्याने तीनही चौकामध्ये कायम स्वरुपी वाहातुक पोलीसांची नेमणुक करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच मलठण फाटा येथे विरोधी दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात अशा वाहानावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज ही व्यक्त होत असून वाहतूक पोलीसांनी कठोर उपाय योजना राबवल्यास वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





























































