
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात मंगळवारी एक गाडी बंद पडल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम पहायला मिळाला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंद पडलेले वाहन बाजूला हटवले.
अमृतांजन पुलाजवळ आणि आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या घटनांमधून धडा घेत यंत्रणांनी तत्परतेने बंद पडलेले वाहन बाजूला घेत वाहतूक खुली केली. वागचूक खुली झाली असली तरी संथगतीने पुण्याच्या दिशेने पुढं सरकत आहे. वाहतूक पूर्ववत व्हायला पुढचा तासभर तरी लागेल, अशी माहिती मिळते.
काल देखील अमृतांजन पुलाजवळ टँकरचा ब्रेक फेल झाल्याने मोठी वाहतूक झाली होती. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत टँकर डोंगराच्या दिशेने वळवल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अन पुढच्या काही वेळात क्रेनच्या साह्याने टँकर बाजूला घेण्यात आला.






























































