आनंद, उत्साह आणि जल्लोष क्षणात मावळला! झुलता पाळणा कोसळून पोलीस अधिकाऱ्याचा मृ्त्यू; अनेक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणाऱ्या फरीदाबादमध्ये सूरजकुंड यात्रेमध्ये एक विचित्र अपघात झाला असून एका पोलीस अधिकाऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. भर गर्दीमध्ये घडलेल्या या अपघातामुळे यात्रेमधलं आनंदी वातावरण एका क्षणात दु:खमय झालं.

अधिक माहिती अशी की, मृत पोलीस अधिकारी जगदीश प्रसाद यांच्यासह 26 जण एका पाळण्यामध्ये बसले होते. पाळण्यात बसेपर्यंत आणि पाळणा सुरू झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पाच ते सहा वेळा पाळणा वर आणि खाली अशा पद्धतीने फिरला आणि अचानक त्याची एक बाजू तुटली आणि धाडकन पाळणा खाली आपटला. पाळणा तुटताच सर्वत्र खळबळ उडाली आणि आरडाओरडा सुरू झाला. पाळण्यामधील नागरिकांना बाहेर काढण्याची धावपळ सुरू झाली. पोलीस अधिकारी जगदीश प्रसाद या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 13 जण या अपघातात जखमी झाले आहे. सर्वांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.