
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालन्यातील कडवंची शिवारात एक अत्यंत भीषण अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याने ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने एक ट्रक अतिशय वेगाने जात होता. कडवंची शिवारात महामार्गावर काही महिला मजूर काम करत होत्या. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या भरधाव ट्रकने महिला मजुरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (घाटी) पाठवले आहेत. हे मजूर नेमके कुठले रहिवासी आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या मृतांची नावे आणि त्यांच्या गावाचा शोध घेत आहेत.



























































