
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये रेल्वेकडे कोणत्याही राज्याने ट्रेन बंद करण्याची मागणी केलेली नाही. त्यामुळे कोविडमध्ये नियम पाळून ट्रेन सुरूच राहतील. परंतु लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याच्या दृष्टीने जनरल डबे जोडले जाणार नसून केवळ ‘कन्फर्म तिकीट’ असणाऱयांनाच प्रवास करता येईल तसेच गर्दी पाहून विशेष गाडय़ा सोडण्यात येतील, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, सीईओ सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या देशात दररोज सरासरी 1490 विशेष ट्रेन चालविण्यात येत आहेत, तर एकूण देशात 5387 उपनगरी लोकल चालविण्यात येत आहेत. 947 पॅसेंजर ट्रेन चालविण्यात येत आहेत. वेळापत्रकातील 70 टक्के ट्रेन पूर्ववत सुरू करण्यात आल्या असल्याचेही अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी सांगितले. ज्या राज्यात कोविडचा प्रादुर्भाव आहे तेथे प्रवाशांना स्थानिक पातळीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे नियम घालण्यात आले आहेत. ते कोविड नियम पाळून ट्रेनची वाहतूक सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर-पूर्व राज्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गाडय़ांची मागणी वाढत असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली येथून गर्दी पाहून आणखी स्पेशल गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
नंदुरबारला रेल्वेने पुरविले कोविड कोच
रेल्वेने चार हजार आयसोलेशन कोच तयार केले आहेत. रेल्वेच्या या कोचमध्ये कोरोना रुग्णांवर ऑक्सिजनसह इतर उपचारांची सोय आहे. नंदुरबार जिह्यातून अशा शंभर कोविड कोचची मागणी केली असून त्यांना सध्या 20 कोच पुरविण्यात आल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना शर्मा यांनी सांगितले. आणखीन कोठून मागणी आल्यास त्याप्रमाणे संबंधित राज्य सरकारला हे कोच उपलब्ध करण्यात येतील. रेल्वेच्या दवाखान्यांत लसीकरण सुरू असून इतर नागरिकांनाही येथे लस घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
























































