नदी पुलावर खोळंबली ट्रेन; ड्रायव्हरने जीव धोक्यात घालून केली सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदान एक्स्प्रेसची सुरक्षा साखळी कोणीतरी खेचल्याने ही ट्रेन टिटवाळा आणि खडवली दरम्यानच्या नदी पुलावर गुरुवारी खोळंबली होती. अखेर ट्रेनचे सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी जीव धोक्यात घालत ट्रेनच्या खाली जाऊन नॉब दाबत या अलार्म चेनला पूर्ववत करीत ट्रेन सुरू केली. सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी दाखविलेल्या धाडस आणि कर्तव्यतत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.

मध्य रेल्वेने टिटवाळा आणि खडवली दरम्यान अडकलेल्या गोदान एक्स्प्रेसचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत प्रवाशांना विनाकारण चेन पुलींग केल्याने सर्वांनाच त्याचा त्रास भोगावा लागत असल्याने योग्य कारणाशिवाय चेन पुलींग न करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात समाजमाध्यमावर ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत नदी पुलावर चाकांच्या खालून अरूंद जागेत शिरत जीवाची पर्वा न करता नॉब दाबण्यासाठी गेल्याचे दिसत आहेत. काही उपद्रवी प्रवाशांनी सुरक्षा चेन खेचल्याने काळू नदीवर ही ट्रेन अडकली. चेनचा नॉब पूर्ववत केल्याशिवाय ट्रेन सुरू करणे शक्य नव्हते. त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यानच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह लोकलचे वेळापत्रकही विस्कळीत होण्याची शक्यता होती. तेव्हा सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी बिकट समयी धाडस दाखवित आपले कर्तव्य बजावल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

मध्य रेल्वेचे आवाहन…
मध्य रेल्वेवर एकट्या एप्रिल महिन्यातच चेन पुलींगच्या तब्बल 197 घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त घटना उत्तरेकडे जाणार्‍या गाड्यांमध्ये घडल्या असून आरपीएफने 166 केसेस दाखल करीत 113 जणांना कोर्टात हजर करीत 56 हजाराचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी जास्त सामानासह प्रवास करू नये, स्थानकांवर गाडीच्या सुटण्याच्या अर्धातास आधी पोहचावे, विनाकारण सुरक्षा चेन खेचू नये असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.