
गुजरातच्या अमरेली जिह्यात एका निवासी भागात खासगी विमान कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याने प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू झाला. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी गिरक्या घेत एका झाडावर आदळले. येथील गिरिया रोड परिसरात दुपारी 12.30 वाजता अज्ञात कारणांमुळे विमानाला अपघात झाला. पायलट प्रशिक्षणार्थी असूनही त्याने एकटय़ाने अमरेली विमानतळावरून उड्डाण केले, असे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी सांगितले. विमान कोसळताच ते आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. सुदैवाने या अपघातात अन्य कोणीही जखमी झाले नाही. दिल्लीस्थित एव्हिएशन अकादमी अमरेली विमानतळावरून पायलटना प्रशिक्षण देते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.