
एसटी महामंडळाच्या पुण्याच्या दापोडी कार्यशाळेने विशेष पर्यटन बस तयार केली असून तिचे छत संपूर्ण पारदर्शक असल्याने निसर्गाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेणे शक्य होणार आहे. ही बस सातारा विभागाला देण्यात आली आहे.
रेल्वेमध्ये पारदर्शक छताचे विस्टाडोम कोच अलीकडेच दाखल झाले आहेत. त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेने ही विशेष पर्यटन बस तयार केली आहे. या बसमध्ये बाहेरील दृश्य दिसावे यासाठी पारदर्शक छताबरोबर इतरही बदल केले आहेत. प्रवाशांना दरवाजातून बाहेरचे दिसावे म्हणून अतिरिक्त काच लावली आहे. जास्त व्हिजन व प्रकाश रूफवर मध्यभागी मिळण्यासाठी समान अंतरावर टिंटेड कर्व्हड ग्लास लावली आहे. चालकाला ताजी हवा मिळण्यासाठी रूफ हॅच दिला आहे. पुढून पाठीमागे चढत्या क्रमाने प्रेक्षागृहासारखी प्रवासी बैठक रचना केल्याने सर्व प्रवाशांना समोरील बाजूने प्रेक्षणीय स्थळे दिसतील. प्रत्येक आसनाला पर्स हूकची व्यवस्था असल्याने स्त्रियांना त्यांच्या पर्स अडकवता येतील. सध्या ही प्रायोगिक बस सातारा विभागाला पुरविण्यात आली असून तिथे महाबळेश्वर, पन्हाळगडसारख्या पर्यटनाला ती वापरण्यात येत आहे.



























































