उसर ते पोयनाड प्रवास अवघ्या १५ मिनिटांत, बैलखिंडीत होणार मिसिंग लिंक प्रकल्प; ३० किमीचे अंतर १२ किमीवर येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उसर ते पोयनाडदरम्यान बैलखिंडमार्गे रखडलेला रस्ता आता पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. हा बैलखिंड मिसिंग लिंक प्रकल्प मार्गी लागल्यानंतर उसर ते पोयनाड हे ३० किलोमीटरचे अंतर फक्त १२ किलोमीटरवर येणार आहे. उसर परिसरात उभारल्या जाणाऱ्या गेल कंपनीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पॉलीमर प्रकल्पामुळे या मार्गाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासाठी उसर ते पोयनाड हा मिसिंग लिंक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला आहे.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या गेल कंपनीकडून उसर येथे पॉलीमर प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा पॉलीमर प्रकल्प असणार आहे. ज्यातून १ हजार मेट्रिक टन पॉलीमरचे उत्पादन होणार आहे. आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय याच परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली जात आहे. ५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहनांची वर्दळ वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन उसर ते पोयनाडदरम्यान प्रस्तावित असलेल्या आणि लालफितीत अडकून पडलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

सध्या उसर येथून अलिबाग, कार्लेखिंड, पेझारी आणि पोयनाड असा प्रवास करावा लागतो, ज्यासाठी जवळपास ३० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते, पण उसर ते पोयनाड मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या १२ ते १५ किलोमीटर येणार आहे. वडखळवरून नागाव, चौलच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांनाही हा मार्ग उपयुक्त ठरू शकणार आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचन होण्याची शक्यता आहे. साडेसात कोटींचा निधी मंजूर सार्वजनिक बांधकाम विभागाने पोयनाड ते उसरदरम्यान बैलखिंडमार्गे प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादन आणि वनविभागाच्या परवानगीसाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वनविभागाच्या मान्यतेनंतर लागलीच या मार्गाच्या कामाचे काम सुरू होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कनिष्ठ अभियंता साईश कांबळे यांनी दिली.