
राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये औषधोपचार मोफतच मिळणार आहेत. या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पैसे आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. त्यामुळे प्रस्तावित दरवाढ मागे घेत ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे घोळ झाला असे सांगण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
राज्यातल्या ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय उपचार मोफत आहेत; पण मोफत उपचार बंद करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सुधारित व अद्ययावत ‘नागरिकांची सनद’ प्रसिद्ध केली होती. यामध्ये वैद्यकीय उपचारांचे दर वाढल्याचे नमूद केले होते. यासंदर्भात ‘ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयात फुकट उपचार बंद’ हे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये 8 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने या वृत्ताची तातडीने दखल घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयातील तपासणी व उपचार हे 23 जानेवारी 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे निःशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच निःशुल्क आहेत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
हजारो गोरगरीबांना दिलासा
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी ग्रामीण भागातील रुग्णालये मोफत उपचारामुळे सर्वसामान्य-
गोरगरीबांसाठी महत्त्वाची ठरतात; परंतु आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘नागरिकांची सनद’मध्ये आरोग्य सेवेचे दर वाढवल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र हे अनावधानाने झाल्याचे कारण सांगत निर्णय मागे घेतल्याने ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.


























































