
विकासकामे करताना पुनर्लागवड कराव्या लागणाऱया झाडांसाठी विकासकाकडून घेण्यात येणाऱया अनामत रकमेत अडीच पट वाढ झाली आहे. 10 हजारांची अनामत रक्कम आता 25 हजार झाली आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला. पूर्वी अनामत रक्कम कमी असल्यामुळे विकासक पालिकेला जुमानत नसत आणि झाडांची पुनर्लागवड न करता दंड भरत असत. त्यामुळे अशा मुजोर विकासकामांना लगाम लावण्यासाठी अनामत रकमेत वाढवण्याची मागणी शिवसेनेने केली होती.
शहरात विकासकामांसाठी झाडे कापावी लागतात. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून विकासकांना काही अटी घातल्या जातात. या आधी झाडे कापण्यासाठी 6 हजार तर ती पुनर्लागवडीसाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येत होती. आता झाडे कापण्यासाठी, त्यांची छाटणीसाठी 15 हजार तर झाडांची पुनर्लागवड करण्यासाठी 25 हजार अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. कापलेल्या एका झाडाच्या बदल्यात 2 झाडे लावणे किंवा त्यांची पुनर्लागवड करणे अशा अटी आहेत. मात्र, पुनर्लागवडीत झाडे जगवणे अतिशय कठीण असते. त्यासाठी खर्चही जास्त येतो. त्यामुळे अशी झाडे जगवण्याकडे लक्ष न देता अनामत रक्कम गेली तरी चालेल, बुडवली तरी चालेल असा विकासकांचा कल होता. अशा मुजोर विकासकांना आळा घालण्यासाठी अनामत रक्कम सरसकट 1 लाख रुपये करावी अशी मागणी सचिन पडवळ यांनी करत पाठपुरावा केला होता. ही रक्कम 25 हजारांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
झालेली वाढ
छाननी शुल्क – 6 हजारांवरून 10 हजार रुपये
वृक्ष कापणी, छाटणी – 6 हजारांवरून 15 हजार
वृक्ष पुनर्लागवड – 10 हजारांवरून 25 हजार रुपये
सरकारी-निमसरकारी खात्यासाठी – 2 हजारांवरून 5 हजार


























































