
ट्रायथलॉन या क्रीडा प्रकारात रनिंग, सायकलिंग व जलतरण या तीन खेळांमधील कामगिरी एकत्रितपणे बघितली जाते. त्यामुळे इतर खेळांच्या तुलनेत या खेळामध्ये खेळाडूंच्या फिटनेसचा कस जास्त प्रमाणात लागला जातो. पुण्यातील बालेवाडी येथे या खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात आणखी तीन ट्रेनिंग सेंटर असायला हवेत. त्यानंतरच ट्रायथलॉनचा महाराष्ट्रात आणखी प्रसार व प्रचार होईल. तसेच या मातीमधून आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडूही घडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र निंबाळते यांनी. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी या खेळातील विविध मुद्दय़ांवर दृष्टिक्षेप टाकला.
मेहनतीसोबतच पैसाही लागतो
ट्रायथलॉनमध्ये करीअर करणे सोप्पे नाहीए. या खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबतच पैसाही लागतो. सायकलची साधारण किंमत 50 हजार रुपये असते. त्यापुढील रकमेच्याही सायकली उपलब्ध असतात. तसेच धावण्यासाठी शूज महागडे घ्यावे लागतात. स्वीमिंग पूलमध्ये सराव करण्यासाठी फी भरावी लागते. या सर्व बाबींसह डाएट, प्रशिक्षकांचाही खर्च आला. त्यामुळे ट्रायथलॉनमध्ये करीअर करणाऱया खेळाडूला तीन लाखांच्या वर खर्च वर्षाला करावा लागतो, असे राजेंद्र निंबाळते यावेळी म्हणाले.
आयर्न मॅनमुळे खेळ वाढतोय
सध्या महाराष्ट्रासह देशामधील बहुतांशी खेळाडू ‘आयर्न मॅन’ ही बिरुदावली मिळवण्यासाठी कष्ट घेत असतात. ट्रायथलॉनप्रमाणेच ‘आयर्न मॅन’ होण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ‘आयर्न मॅन’च्या वाढत्या क्रेझमुळे ट्रायथलॉन हा खेळही झपाटय़ाने वाढू लागला आहे, असे राजेंद्र निंबाळते स्पष्टपणे म्हणाले.
चेन्नईत रंगतो खेळाडूंचा सराव
हिंदुस्थानसाठी निवड झालेल्या खेळाडूंना चेन्नई येथे सरावाला बोलावले जाते. चेन्नई येथे अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर उपलब्ध आहे. तेथे जलतरण, रनिंग व सायकलिंग या तिन्ही खेळाच्या सुविधा एकाच ठिकाणी असल्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंचा कॅम्प तिथेच आयोजित करण्यात येतो, असे राजेंद्र निंबाळते पुढे सांगतात.
ऑनलाइन मार्गदर्शन
या वर्षी ट्रायथलॉनची एकही स्पर्धा कोरोना व लॉकडाऊनमुळे खेळवण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धाही स्थगित करण्यात आली. या कालावधीत खेळाडूंचा वेळ वाया जाऊ नये यासाठी आमच्या असोसिएशनकडून ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोरोनामध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, असे राजेंद्र निंबाळते आवर्जून सांगतात.
दोन महिने खेळ सुरू होणार नाही
ट्रायथलॉनमध्ये जलतरण या खेळाचाही समावेश असतो. पाण्यामधूनही संसर्ग झाल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे हा खेळ सुरू होण्यासाठी किमान आणखी दोन ते तीन महिने लागू शकतात. आम्हीही खेळाडूंना काळजी घेण्याचा सल्ला वारंवार घेत असतो, असेही राजेंद्र निंबाळते सांगतात.


























































