आदिवासी विकास महामंडळाची गोदामे फुल्ल; भात खरेदी रखडली, चार हजार क्विटल भात भरडाई अभावी पडून

कधी अवकाळी तर कधी मुसळधार पावसाशी सामना करून पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भात पिकवला. उरलेसुरले पीक वाचवून दोन पैसे गाठीशी मिळतील अशी आशा होती, पण डिसेंबर महिना सरत आला तरी आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. तब्बल चार हजार क्विटल भात भरडाईअभावी गोदामांमध्ये पडून असून ही गोदामे फुल्ल असल्याने भात खरेदी रखडली आहे. महामंडळाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

पालघर जिल्ह्यात महामंडळाचे ७१ गोडाऊन असून त्यापैकी २४ गोडाऊनमधील भात उचलला गेला आहे, तर ४७ गोडाऊनमधील भात पडून आहे. चालतवड येथील गोडाऊनमध्ये १ हजार ३८ क्विंटल भात तर जव्हार गोडाऊनमध्ये ३ हजार ५० क्विंटल भात भरडाईअभावी पडून आहे. जव्हार तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यामध्ये चार महिने भात, नागली, वरई ही पिके घेतात व साधारण ऑक्टोबरमध्ये भात झोडणी करून नोव्हेंबरपर्यंत भात आधारभूत धान्य खरेदी केंद्रात विकला जातो, पण अजूनही ही केंद्रे प्रत्यक्षात सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास
आधारभूत धान्य खरेदी केंद्रात भात विकल्यानंतर आदिवासी बांधव पुढील रोजगारासाठी ठाणे, मुंबई, वसई, विरार, नाशिक तसेच गुजरात राज्यात जात असतात. यावर्षी डिसेंबर महिना संपत आला असतानासुद्धा भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यामुळे जव्हार तालुक्यातील शेतकरी ही केंद्रे कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

१६ राईस मिलची मुदत संपली
भाताच्या भरडाईसाठी पालघर जिल्ह्यात १६ राईस मिल असून त्यांची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती. त्यांना अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्यामुळे गोडाऊनमधील भात भरडाईसाठी उचलला गेला नाही. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. भरडाईची मुदतवाढ मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली. भात ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे खरेदी बंद आहे. मात्र कागदपत्रांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच खरेदी सुरू केली जाईल असेही पाटील यांनी सांगितले.