
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. अशा ऋषितुल्य राजकारण तपस्व्याचं जाणं हा एका युगाचा अस्त असल्याचं मत राजकीय वर्तुळातून व्यक्त झालं.
तपस्वी मूर्तीचे जाणे वेदनादायी
ज्या नेत्यांकडे पाहून मी राजकारणाची पायरी चढलो त्यापैकी एक आदर्श म्हणजे वाजपेयी होते. आज माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळय़ांपुढे तरळत आहेत. दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासोबत वाजपेयी यांची पहिली भेट झाली होती. वाजपेयी यांच्या अचानक निघून जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. संसद असो की एखादी जाहीर सभा असो, वाजपेयी यांचे भाषण ऐकण्यासारखा दुसरा ज्ञानानंद नाही. ज्ञानाचा महासागर, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी, त्यागाच्या तपस्वी मूर्तीचे जाणे अतिशय वेदनादायी आहे. कधीही न भरून येणारी हानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एका युगाचा अस्त झाला
देशाच्या राजकारणातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्त्व तसेच भारतीय संसदीय राजकारणातील पितामह, अमोघ वक्तृत्वाचे धनी, संवेदनशील कवी हरपला. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींजी यांच्या अनेक बैठका व गाठीभेटी महापौर निवास येथे झाल्या. महापौर निवास या घटनांचा साक्षीदार आहे. त्यांचे निधन झाल्याचे समजताच खूप दुःख झाले. शिवसेना-भाजप युती टिकविण्यामध्ये वाजपेयीजींचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी नेहमीच युतीच्या मदतीचा हात शिवसेनाप्रमुखांना दिला. या एका युगाचा अस्त झाला.
-विश्वनाथ महाडेश्वर, महापौर
लाडके नेते गमावले
वाजपेयी यांच्या जाण्याने मला अति दुःख झाले. राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्त्व होते. असे लाडके नेते हिंदुस्थानने गमावले. ही उणीव भरून निघणार नाही
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल
सदैव तळपत राहिले
‘अटलबिहारी वाजपेयी राजकीय वर्तुळात सदैव तळपत राहिले. हिंदुस्थानच्या राजकारणात ते सगळय़ांबरोबर मित्रासारखे वागले. ते प्रेमळ पंतप्रधान होते. विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा परिचय होता. त्यांच्या जाण्याने बहुरंगी, बहुढंगी ‘रत्न’ आणि हीरा आपण गमावून बसलो आहोत.’
-व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
सर्वोत्कृष्ट संसदपटू
‘अटलजींच्या जाण्याने आपण सगळय़ांनी एक महान व्यक्ती, हळव्या मनाचा कवी, उत्कृष्ट वक्ता, अत्यंत चांगला माणूस गमावला. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची ओळख होती, असे उत्तम राजकारणी, प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व देशाने गमावले.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
देशाचे मोठे नुकसान
वाजपेयी यांच्या निधनाने एक महान राजकीय नेता देशाने गमावला आहे. वाजपेयी यांनी आपले पूर्ण जीवन देशाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी वाहील. त्यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हिंदुस्थानच्या राजकारणात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याबरोबरच्या अनेक चांगल्या आठवणी आज माझ्या मनात तरळून जात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
कवीमनाचे महानेतृत्व हरपले
राजकारणातील अजातशत्रू, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे कवीमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एवढीच वाजपेयी यांची प्रतिमा नव्हती तर सर्व राजकीय पक्षात त्यांचे चाहते होते. घराघरात त्यांच्या वक्तृत्वाचे चाहते होते. त्यांना मराठी भाषेचेही चांगले ज्ञान होते. देश उभारणीत महत्त्वाचा वाटा असलेले आणि प्रेरणादायी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
-रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
नैतिक मूल्यांवर श्रद्धा असणारा लोकनेता
वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मूल्यांवर अढळ श्रद्धा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला. खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने वाजपेयी यांनी दीर्घकाळ संसद गाजवली. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
-अशोक चव्हाण, खासदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे हिंदुस्थानच्या राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपले आहे. कवीमनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं.
– राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते
वाजपेयींचे जाणे हा युगान्त
देशातील संसदीय लोकशाहीला प्रगल्भ करणारा असामान्य नेता, परराष्ट्रनीताला नवे पैलू पाडणारे मुत्सद्दी, देशातील पर्यायी राजकीय संस्कृतीचे अधिष्ठाता, विरोधकांनाही स्वतःशी जोडून घेणारे संघटक, बलशाली हिंदुस्थानचे उद्गाते आणि जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारे संवेदनशील कवी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व शतकातून एकदाच जन्माला येते.
-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष
देशभक्त नेतृत्वाची उणीव भासेल
साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली वाजपेयी यांची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली. त्यांचे सुसंस्कृत राजकारण जवळून बघता आले याचा मला खरंच आनंद आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पंच्याहत्तरीकडे वाटचाल करीत असताना खऱया अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. – राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
देशाला कायम कमतरता भासेल
वाजपेयी यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. अटलजींनी देशाला आपले आयुष्य अर्पण केले होते. एक महान राजकारणी, अद्वितीय लोकसेवक, प्रभावी कवी, शानदार वक्ता, उत्कृष्ट खासदार आणि महान माणूस देशाने गमावला आहे. आधुनिक हिंदुस्थानातल्या प्रमुख नेत्यांपैकी अटलबिहारी वाजपेयी एक होते. या देशाला त्यांची कमतरता कायम भासेल. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान नेता गमावला आहे.
– मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान
विनोदबुद्धी असलेले महान नेते
‘अटलबिहारी यांच्या निधनाने आम्हा सगळय़ांनाच दुःख झाले आहे. लोकांसाठी अपार करुणा आणि विनोदबुद्धी असलेले ते एक महान नेते होते. लोकांच्या मनात ते शेवटपर्यंत राहतील.’ हिंदुस्थानची आर्थिक भरभराटीसाठी त्यांनी औद्योगिक क्षेत्राकडेही कटाक्षाने लक्ष दिले.
– रतन टाटा, उद्योगपती
माझ्या जवळचा माणूस गमावला
‘अटलबिहारींच्या निधनाने मी माझ्या जवळचा माणूस गमावला आहे. त्यांनी मला संधी दिली. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी हा प्रवास करू शकलो. दुःखाला शब्दांत मांडता येणार नाही अशी ही हानी आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना देवो. तुमची आठवण सदैव येत राहील.’
– ओमर अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स
देशाचे नाव जागतिक पातळीवर नेले
‘हिंदुस्थानी शास्त्रज्ञ अटलबिहारी वाजपेयी यांचा सदैव ऋृणी राहील. जय जवान-जय किसान या घोषणेचा त्यांनी प्रयत्नपूर्वक विस्तार केला आणि पोखरण अणू चाचणी करून ‘जय विज्ञान’ त्यासोबत जोडले. पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी करून त्यांनी देशाचे नाव जागतिक पातळीवर नेले.’
– डॉ. हर्ष वर्धन, भाजप खासदार
त्यांच्या संवादशैलीवर लोकांनी प्रेम केले
‘अटलबिहारी आणि राजमाताजींच्या आशीर्वादानेच मी राजकारणात आले. त्यांच्या प्रेरणेनेच मी राजकारणात पहिले पाऊल टाकले. बुद्धी आणि विनोदबुद्धीची नैसर्गिक देणगी त्यांच्याकडे होती. त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण संवादशैली आणि हावभावांवर लोकांनी प्रेम केले. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले.’
– वसुंधराराजे शिंदे, मुख्यमंत्री, राजस्थान
ते मला माझ्या वडिलांच्या जागी होते
अटलबिहारी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर माझ्यावर जणू डोंगरच कोसळला आहे. मी त्यांना वडिलांच्या जागी मानत होते. त्यांनीही मला मुलीचे स्थान दिले होते. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणायचे. आज मला तेवढेच दुःख झाले आहे जितके माझ्या वडिलांच्या निधनावेळी झाले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
– लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका
























































