विधानसभेआधी ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक! बाबुल, राजीव, मेनका आणि कोयल यांना दिली राज्यसभेची उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, माजी आयपीएस अधिकारी राजीव कुमार, आमदार मेनका गोस्वामी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कोयल मल्लिक यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सामाजिक आणि राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बाबुल सुप्रियो –

तृणमूलच्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चा बाबुल सुप्रियो यांच्या नावाची आहे. माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिया यांनी 2021 मध्ये भाजपला रामराम करत टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रमुख चेहरा होते. 2021 च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बाबुल सुप्रियो हे भोजपुरी गायक असून रामभक्त आहेत. बंगालमध्ये 70 टक्के हिंदू लोकसंख्या असून त्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी, तसेच टीएमसीवरील हिंदू विरोधी टॅग पुसण्यासाठी बाबुल सुप्रिया हा हुकुमाचा एक्का ममता बॅनर्जी यांनी बाहेर काढला आहे. बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी देऊन ममतांनी भाजपच्या हिंदुत्व कार्डाला उत्तर दिल्याची चर्चा आहे.

राजीव कुमार –

माजी आयपीएस अधिकारी राजीव कुमार हे ममतांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. प्रशासकीय अनुभव आणि कायदेशीर बाबींची जाण असलेले राजीव कुमार केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांविरुद्ध (ED/CBI) संसदेत आक्रमक भूमिका मांडू शकतात. त्यांना उमेदवारी देऊन ममतांनी बंगालच्या सुशिक्षित आणि मध्यमवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मेनका गोस्वामी –

जादवपूरच्या आमदार मेनका गोस्वामी यांच्या माध्यमातून टीएमसीने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी महिलांमध्ये त्यांची पकड मजबूत असल्याने, पक्षाचा हा मोठा व्होट बँक सुरक्षित होईल.

कोयल मल्लिक –

टॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिकच्या एन्ट्रीमुळे तरुणांमध्ये पक्षाची क्रेझ वाढण्याची शक्यता आहे. ममतांनी याआधीही सिनेसृष्टीतील चेहऱ्यांना राजकारणात संधी दिली आहे, जो प्रयोग अनेकदा यशस्वी ठरला आहे. दरम्यान, सध्या राज्यसभेत टीएमसीच्या 13 जागा आहेत. या चार जागांनंतर ही संख्या 17 वर पोहोचेल.