
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानाला दहशतवादाविरुद्ध जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आता अमेरिकेनेही हिंदुस्थानाला पाठिंबा देण्याचे उघडपणे आश्वासन दिले आहे. याच संदर्भात बोलताना अमेरिकन संसदेचे अध्यक्ष्य माईक जॉन्सन म्हणाले की, “हिंदुस्थानला कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाविरुद्ध उभे राहावे लागेल. आम्ही हिंदुस्थानला पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरोधातल्या लढाईत हिंदुस्थानला सर्वतोपरी मदत करेल.” अमेरिकेत कॅपिटल हॉलमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.
माईक जॉन्सन म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानात जे काही घडले त्याबद्दल आमच्या पूर्ण संवेदना त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला आमच्या मित्रपक्षांसोबत उभे राहायचे आहे. मला वाटते की, हिंदुस्थान हा अनेक बाबतीत आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे. दोन्ही देशांमधील व्यापाराबाबतची चर्चा लवकरच यशस्वी होईल. जर धोका वाढला तर तुम्हाला दिसेल की, ट्रम्प प्रशासन संसाधनांसह सर्व शक्य मदत करेल.”