
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानला 350 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देऊन दोन्ही देशांमधील तणाव मिटवला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून ‘आम्ही युद्ध करणार नाही’, असे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
यावर्षी मे महिन्यात त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव ‘संपवण्यासाठी मदत केली’, असा दावा ट्रम्प यांनी 60 हून अधिक वेळा केला आहे, तर हिंदुस्थानने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचा दावा सातत्याने फेटाळला आहे.
ट्रम्प बुधवारी म्हणाले, ‘वाद मिटवण्यात पक्का आहे आणि मी नेहमीच तसा राहिलो आहे. अनेक वर्षांपासून मी त्यात खूप चांगले काम केले आहे… मी विविध युद्धांबद्दल बोलत होतो… हिंदुस्थान, पाकिस्तान… ते एकमेकांवर अण्वस्त्रे टाकण्याच्या तयारीत होते.’
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत झालेल्या यू.एस.-सौदी गुंतवणूक मंचावरून बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी या दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांना सांगितले की, ते युद्ध करू शकतात, ‘पण मी दोन्ही देशांना सांगितले की दोन्ही देशावर 350 टक्के शुल्क लावत आहे. अमेरिकेशी आता कोणताही व्यापार होणार नाही’. त्यानंतर दोन्ही देशांनी आपल्याला असे न करण्यास सांगितले, असा दावा करून ट्रम्प म्हणाले की, ‘मी त्यांना सांगितले, मी हे करणार आहे. माझ्याकडे परत या आणि मग मी हे शुल्क कमी करेन. पण तुम्ही एकमेकांवर अण्वस्त्रे डागून लाखो लोकांना मारून, अण्वस्त्र स्फोटांची धूळ लॉस एंजेलिसवर तरंगू द्यावी हे मी होऊ देणार नाही. मी हे करणार नाही’. त्यानंतर ट्रम्प म्हणाले की, त्यांची तयारी पूर्ण होती आणि त्यांनी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना सांगितले की, ते संघर्ष मिटवण्यासाठी 350 टक्के शुल्क लावतील. त्यांनी पुढे सांगितले की, जर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले, तर आम्ही व्यापार करार करू, कारण त्यावेळी व्यापार करार वाटाघाटीच्या मध्यभागी होते.
‘आता, इतर कोणत्याही अध्यक्षाने असे केले नसते… मी हे सर्व युद्ध मिटवण्यासाठी टॅरिफचा वापर केला, सर्व नाही. आठपैकी पाच युद्धे अर्थव्यवस्था, व्यापार आणि शुल्कामुळे मिटवली गेली’, असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांना फोन करून लाखो लोकांचे जीव वाचवल्याबद्दल व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईल्स यांच्यासमोर त्यांचे आभार मानले.
त्यानंतर ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांना ‘पंतप्रधान मोदींकडून कॉल आला, ‘आम्ही थांबलो आहोत’. मी विचारले, ‘कशावरून थांबलात?’, त्यावर मोदींनी उत्तर दिले, ‘आम्ही युद्ध करणार नाही’. त्यानंतर आपण मोदींचे आभार मानले आणि ‘चला एक करार करूया’, असे सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी असेही सांगितले की त्यांनी इतर अनेक युद्धांमध्ये लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत.
सौदीच्या युवराजांसोबत ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीतही ट्रम्प यांनी आदल्या दिवशी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा हाच दावा पुनरुच्चारित केला होता.
10 मे पासून, जेव्हा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर घोषित केले की वॉशिंग्टनच्या मध्यस्थीनंतर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान पूर्ण आणि त्वरित युद्धविरामावर सहमत झाले आहेत, तेव्हापासून त्यांनी 60 हून अधिक वेळा दावा केला आहे की त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव मिटवण्यात मदत केली.
पहलगाम हल्ल्यात 26 नागरिक मारले गेल्यानंतर हिंदुस्थानने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते.
हिंदुस्थानने कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाचा दावा सातत्याने फेटाळला आहे.



























































