अमेरिकेला धमकी द्याल, तर परिणाम भोगावे लागतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

‘अमेरिकेला धमकी देण्याची चूक करू नका, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणला दिला आहे. ‘अमेरिकेला धमकी दिल्यास इतिहासातही उल्लेख सापडणार नाही, असा धडा शिकवू’ असे ट्रम्प यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांना ट्विटरवरून दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे. आपल्या इशाऱ्यातील गांभीर्य दशर्वण्यासाठी ट्रम्प यांनी संपूर्ण ट्वीट कॅपिटल लेटरमध्ये लिहिले आहे. ‘झोपलेल्या सिंहाला जागे करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला पश्चाताप होईल’, अशी धमकी रुहानी यांनी ट्रम्प यांना दिली होती. त्यावर ट्रम्प यांनी इराणला प्रत्युत्तर दिले आहे.

आमच्याशी संघर्ष केल्यास मोठे युद्ध होईल, असा इशाराही रुहानी यांनी रविवारी एका राजकीय कार्यक्रमात दिला होता. ‘इराणची शांतता सर्वात महत्त्वाची आहे. आमची शांतता भंग केली तर सर्वात मोठ्या युद्धाला सामोरे जाण्यास तयार राहावे लागेल, हे इराणच्या शत्रूंनी चांगल्या प्रकारे समजून घ्यावे’, असे सांगत रुहानी यांनी ‘सिंहाच्या शेपटीशी खेळू नका, तुम्हाला पश्चाताप होईल’ अशा शब्दांत ट्रम्प यांना इशारा दिला होता.

अमेरिकेने मे महिन्यात इराणशी असलेला अणुसहकार्य करार रद्द केला होता. तसेच इराणवर आणखी निर्बंध लादले होते. त्यांची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. हा करार अमेरिकेचे नुकसान करणारा असल्याचे सांगत सत्तेत आल्यास करार रद्द करण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते.