
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. खामेनी यांचे अत्यंत विश्वासू आणि इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे धमकी दिली आहे. “आमच्या नेत्याच्या रक्ताचा बदला घेतला जाईल आणि ट्रम्प यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल,” असे लारीजानी यांनी म्हटले आहे.
लारीजानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी आपल्या भ्रामक महत्त्वाकांक्षेमुळे संपूर्ण मध्य-पूर्वेला युद्धाच्या खाईत ढकलले आहे. इराणमध्ये १,००० हून अधिक लोक शहीद झाल्याचा दावा करत त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिला की, हे युद्ध लवकर संपणार नाही.
लारीजानी यांच्या या धमकीला डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना अशा धमक्यांची पर्वा नाही (I couldn’t care less). यापूर्वीच ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणचे नेतृत्व जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही.




























































