
दक्षिण पॅसिफिक महासागरातील टोंगा बेटांजवळ मंगळवारी शक्तिशाली भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाची खोली अंदाजे 237 किलोमीटर होती. टोंगामधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या नेयाफूच्या पश्चिमेला सुमारे 153 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या आत हा भूकंप झाला. भूकंपानंतर टोंगाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने रहिवाशांना समुद्रकिनारे आणि सखल किनारपट्टी भागातील आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, किनारपट्टीच्या प्रदेशांना त्सुनामीचा तडाखा बसण्याचा धोका असल्याने टोंगा सरकारने आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील लहान बेटांचा देश आहे. हा प्रदेश पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ नावाच्या सक्रिय भूकंप क्षेत्रात येत असून येथे भूकंप आणि ज्वालामुखीच्या घटना वारंवार घडतात.

























































