
सामना ऑनलाईन,मुंबई
पावसाळ्यात रस्त्यांवर साठणारे पाणी 30 मीटर खोल भुयारात जमा करून माहुल येथील प्रस्तावित उदंचन केंद्रातून समुद्रात सोडल्यास पावसाळ्यात मुंबई पूरमुक्त होण्यास मदत होईल अशी योजना आखण्याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक पातळीवर पूरनियंत्रणाचे काम यशस्वीपणे करणाऱ्या तज्ञांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत या योजनेवर विचार करण्यात आला.कमी वेळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईत काही ठिकाणी काही वेळासाठी पूरसदृश स्थिती निर्माण होऊन वाहतुकीला व पादचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. परळ नाक्यापासून शीवपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर येथे पावसाळ्यात एक-दोन वेळेस पाणी तुंबते. हा भाग समुद्राच्या पातळीपेक्षा एक मीटरहून अधिक सखल असल्यामुळे जमलेले पावसाचे पाणी लगेच समुद्रात वाहून जात नाही. त्यातही एका तासात 50 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आणि त्याचवेळेस समुद्राला भरती असेल तर रस्त्यात पाणी तुंबते. यातून सुटका व्हावी यासाठी महापालिका गांभीर्याने उपाय शोधत आहे.
बँकॉक येथे 2011 मध्ये आलेल्या पूरसंकटावर मात करणारी कायमस्वरूपी योजना यशस्वीपणे राबविणारे किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई मनपाचे उपायुक्त सुधीर नाईक व पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे उपमुख्य अभियंता प्रमोद खेडकर यावेळी उपस्थित होते. यावर महापालिकेने सल्लागारांची नियुक्ती करून प्रकल्प अहवाल तयार करून द्यावा असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत दिले. योग्य नियोजन आणि उपाययोजनेमुळे मुंबई लवकरच पूरमुक्त होईल, असा विश्वासही यावेळी देसाई यांनी व्यक्त केला.





























































