काळाचौकीत कासवांची तस्करी पकडली

सामना ऑनलाईन । मुंबई

स्टार कासवांच्या पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी रे रोड येथे आलेल्या दोघा तस्करांना काळाचौक पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील 106 कासवांची पिल्ले हस्तगत करण्यात आली.

दोन इसम स्टार कासवांची पिल्ले घेऊन रे रोड परिसरात येणार असल्याची खबर उपनिरीक्षक प्रशांत जाधव व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी एपीआय चव्हाण, उपनिरीक्षक जाधव, अंमलदार गिरमे, पोटे, सय्यद, सांगळे या पथकाने कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सय्यद अयुब (26) आणि कासिम शेख (20) हे दोघे तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांनी एक बॅगेत भरून आणलेले 106 कासवांची पिल्ले हस्तगत करण्यात आली. ही पिल्ल ते कोणाला विकणार होते याचा पोलीस शोध घेत असून कासवांची पिल्ले वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली.