
दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर उसळणारी प्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’ला तात्पुरत्या स्वरूपात जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात सुट्ट्यांनिमित्त गावाला जाणाऱया प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने ट्रेन क्र. 11003 / 11004 दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’ला 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान 1 स्लिपर क्लास आणि 3 जनरल सेकंड क्लासचे जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दादर स्थानकाच्या फलाट 5 वरून नेहमीच्या वेळेवर रात्री 11.55 वाजता सोडण्यात येणाऱया ट्रेन क्र. 11003 दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्प्रेस रिकामा डबा जोडण्यात आलेला असेल आणि ही गाडी रा. 12.05 वाजता सोडण्यात येईल याची प्रवाशांनी दक्षता घ्यावी. तसेच परतीची ट्रेन क्र. 11004 सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्प्रेस दादरच्या फलाट क्र. 5 वर सकाळी 6.45 वाजता येईल अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


























































