Siddharth Shukla अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, मालिका विश्वावर पसरली शोककळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस-13’ चा विजेता आणि छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (40) याचे गुरुवारी सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सिद्धार्थच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे सोपवले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

प्रकृती अचानक बिघडल्याने सिद्धार्थला गुरुवारी सकाळी कूपर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच सिद्धार्थची प्राणज्योत मालवली अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. सिद्धार्थच्या अकाली एक्झिटमुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. राजकुमार राव, जय भानुशाली, संभावना सेठ, राहुल महाजन, दिग्दर्शक अशोक पंडीत आदींनी सिद्धार्थच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

छोटा पडदा, रिऑलिटी शो गाजवला

सिद्धार्थने केवळ आईच्या हट्टामुळे मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. 2005 साली त्याने ‘वर्ल्ड बेस्ट मॉडेल’चा किताब पटकावला. ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिकेत तो पहिल्यांदा झळकला. मात्र त्याला खरी प्रसिद्धी ‘बालिका कधू’मुळे मिळाली. ‘लक यू जिंदगी’, ‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’, ‘दिल से दिल तक’मध्येही तो झळकला. ‘बिग बॉस 13’ आणि ‘खतरोंके खिलाडी 7’ चा तो विजेता होता. ‘सावधान इंडिया’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मधून सिद्धार्थने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.