TVK Vijay Rally Stampede – मृतांचा आकडा 39 वर, 95 जखमी; स्टॅलिन सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर

सुपरस्टार अभिनेता थलपती विजय याच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 39 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये 16 महिला, 8 लहान मुलांचाही समावेश असून 95 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 51 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तामिळनाडूच्या करूर येथे शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.

विजयच्या तमिलगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाने शनिवारी करूर येथे एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. विजयचे भाषण सुरू असताना गर्दी हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. याच दरम्यान एक 9 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आल्याने विजयने कार्यकर्त्यांना तिचा शोध घेण्याचे आवाहन केले. मात्र गर्दी सैरभर झाली आणि यात अडकल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे विजयने भाषण थांबवले आणि गर्दीला शांततेचे आवाहन करत त्याने तिथून काढता पाय घेतला.

10 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 1 लाख रुपयांची मदत केली जाईल.

चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना दु:ख व्यक्त केले आहे. गर्दीत अडकलेल्या लोकांना आणि बेशुद्ध झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय मदत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच परिस्थितीवर आपले बारीक लक्ष असून माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम एम.ए. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले.