21 तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेच्या अटी इराणने धुडकावल्या, ट्रम्प यांनी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू झालेली इराण व अमेरिकेमधील 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी धुडकावून लावल्याने दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण तयारीनिशी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले. त्यामुळे शस्त्रसंधीचे भवितव्य अंधारात गेले असून पुन्हा युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

तब्बल 40 दिवस चाललेले युद्ध थांबवण्यासाठी इराण आणि अमेरिकेने प्राथमिक मान्यता दिली होती. त्यासाठी इस्लामाबाद येथे चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यातून काहीही हाती लागले नाही. ‘इराण-अमेरिकेमध्ये कुठलाही समझोता झाला नाही ही बॅड न्यूज आहे. मात्र ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त दुःखद बातमी आहे. इराण आमचे काहीच ऐकायला तयार नाही. अणु कार्यक्रम थांबवण्याचाही त्यांचा विचार नाही,’ असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी बैठकीनंतर सांगितले.

बैठकीतही लढाई! नेते एकमेकांच्या अंगावर धावले!!

शांतता करारासाठी झालेल्या इराण-अमेरिकेच्या बैठकीत राडा झाल्याचे वृत्त आहे. होर्मुझच्या मुद्दय़ावरून वादाची ठिणगी पडली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. एका क्षणी हे दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावल्याचे वृत्त तुर्की मीडियाने दिले आहे.