
केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारण देत माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट एक तास ब्लॉक करण्यात आले.
ट्विटरने एक तासासाठी ब्लाक केलेले अकाऊंट परत सुरू केल्यावर मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉट शेअर करत माहिती दिली. मित्रांनो, आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटचा अॅक्सेस जवळजवळ तासभर दिला नव्हता. अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचे मला सांगण्यात आल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियासंदर्भातील नव्या नियमावलीवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. या प्रकरणात गेल्याच आठवडय़ात ट्विटरच्या प्रतिनिधींना आयटी मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीसमोर बोलविण्यात आले होते. त्यावेळी ट्विटरच्या अधिकाऱयांनी आम्ही आमच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यास बांधील आहोत. जे देशाच्या कायद्यानुसार असल्याचे स्पष्ट केले. या युक्तिवादास संसदीय समितीने आक्षेप घेत आमच्या येथे आमच्या देशाचा कायदा सर्वात मोठा आहे. तुमचे धोरण नाही, अशा कठोर शब्दांत सुनावले होते. त्यानंतर ट्विटरने थेट माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचे अकाऊंट ब्लॉक केल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
ट्विटरची ही कारवाई म्हणजे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र्ा नियम) 2021 मधील नियम 4(8) चे उल्लंघन आहे. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटला अॅक्सेस नाकारण्याआधी सूचना दिली नव्हती. त्यावरून ट्विटरला नवीन नियम पाळायचे नाहीत हे सिद्ध होत आहे.
– रविशंकर प्रसाद


























































