हवेली तहसीलदारांना बळजबरीने पैसे पाठविणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर कारवाई करणाऱ्या हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने गुगल पेवरून 50 हजारांची पैसे पाठविणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय हिरामण पिंगळे वय 33 रा. देउळगावगाडा, दौंड आणि अमित नवनाथ कांदे वय 29,रा. मांजरी बुद्रूक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपींनी तहसीलदार कोलते यांच्या संमतीशिवाय त्यांच्या ‘गुगल पे’ वर 50 हजार रुपये पाठवून लाच देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित मालकाविरुद्ध खडक पोलीस ठाण्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तहसीलदार यांनी तक्रार दाखल केली होती. बेकायदा वाळू वाहतूक करीत असलेल्या ट्रकचालकावर त्यांनी कारवाई केली होती. याप्रकरणी संबंधितांनी कोलते यांना फोन करून बँकखात्याची विचारणा केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीस कोलते यांनी खडसावून तुमच्या विरोधात लाच देत असल्याची तक्रार देते असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह खडक पोलिसांकडे तक्रार केली होती.