
आय ड्रॉप तयार करण्यासाठी लागणारी पावडर चोरून ती काळया बाजारात विकणाया दोघांना क्राईम ब्रँच युनिट 7 ने अटक केली. हनुमंत उर्फ भैया विलास खराडे आणि नेताजी बाळासाहेब माने अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून एक कोटी 20 लाख रुपये किमतीची पावडर पोलिसांनी जप्त केली आहे. पावडर चोरीच्या गुह्यात हनुमंतला उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. जामिनावर बाहेर येताच तो ती पावडर विकण्यासाठी मुंबईत आला होता.
दौंडच्या कुरकुंभ येथे एमआयडीसी आहे. त्या एमआयडीसीत एका कंपनीत आय ड्रॉप बनवले जातात. मार्च महिन्यात अज्ञात व्यक्तीने कंपनीत चोरी करून 75 किलो पावडर चोरी केली होती. चोरी प्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांनी 8 जणांना अटक करून 40 किलो पावडर जप्त केली होती. त्या गुह्यात हनुमंतचे नाव समोर आले होते. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. जामिनावर बाहेर येण्यासाठी खर्च खूप झाला होता. तो खर्च भरून काढण्यासाठी हनुमंतने लपवलेली पावडर मुंबईत जाऊन विकायचे ठरवले.
दौंड येथून दोन जण आय ड्रॉपची पावडर विकण्यासाठी विक्रोळी परिसरात येणार असल्याची माहिती युनिट 7 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीवर्धनकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुधीर जाधव आदी पथकाने तपास सुरु केला. हनुमंत आणि नेताजी हे दोघे पावडर घेऊन आले असता त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडून दहा किलो पावडर जप्त केली आहे. जप्त केलेल्या पावडरची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. त्या दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले.



























































