केबल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

बीकेसी परिसरात जेसीबीच्या सहाय्याने जमिनीतून केबल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. फक्रुद्दीन शहा आणि रहमान अली अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी बीकेसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कैलास लोहार हे पथकासह एमटीएनल सिग्नल येथे गस्त करत होते. तेव्हा पोलिसांना रस्त्यावर एक जेसीबी खोदत असल्याचे दिसले. पोलीस तेथे पोहचल्यावर एक जण तेथून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी जेसीबी चालकाला काम थांबवण्यास सांगितले. पोलिसांनी रहमान अलीला आणि फक्रुद्दीनला ताब्यात घेतले. रहमान अली हा जेसीबी चालक असून फक्रुद्दीन हा भंगार विक्रेता आहे. केबल चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्या दोघांविरोधात बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली.