ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या सराईत महिलेसह दोघींना अटक; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानांमध्ये प्रवेश करून दागिने चोरणाऱ्या सराईत महिलेसह दोघींना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 50 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले असून इतर दोन सराफी पेढीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ज्योत्स्ना सुरज कछवाय (वय 31, रा. अपर इंदिरानगर) आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर (वय 29, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

दत्तवाडीतील नंदादीप ज्वेलर्समध्ये खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोन महिला पर्वती दर्शन परिसरात थांबल्याची माहिती प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला आणि दयानंद तेलंगे पाटील यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार आणि चंद्रकांत कामठे यांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, एसीपी सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक विजय खोमणे उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, राजु जाधव, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे , प्रमोद भोसले , दयानंद तेलंगे पाटील , पुरुषोत्तम गुन्ला , नवनाथ भोसले, किशोर वळे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, शरद राऊत, अमोल दबडे यांनी केली.

लक्ष विचलित करून चोरी
आरोपी ज्योत्स्ना कुछवाह सराईत चोर असून यापुर्वी तिच्यावर चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करून सोनाराचे लक्ष विचलीत करीत ती चोरी करीत होती. दोघींनी आणखी कोठे केली आहे काय, याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करीत आहेत.